logo

उत्तर भारतीय कलाकारांचे डॉ.बाबासाहेबांना अभिवादन! गणतंत्रदिनी भोजपुरी फिल्म भीमराज मुहूर्त संपन्न!

तळेगाव दाभाडे, 28 जानेवारी:
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या श्रध्देपोटी सुमारे दीड हजार किलोमीटर प्रवास करून आलेल्या उत्तर भारतीय कलाकारांनी तळेगाव दाभाडे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानाला भेट देत 75वा गणतंत्र दिवस साजरा केला. निमित्त होते भोजपुरी फिल्म ‘भीमराज’च्या मुहूर्ताचे.

प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त साधून या उत्तर भारतीय कलाकारांनी 'भीमराज' या चित्रपटाचा मुहूर्त संपन्न केला. निर्माते विजयभान बुद्ध, शिलप्रिया बुद्ध यांनी डॉ.बाबासाहेब, रमाबाई आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण केले. डायरेक्टर पी.एल. प्रजापती, अभिनेता मुकेश लाल यादव आणि नितीन पानसे यांनी भारतीय संविधान ग्रंथाची पूजा करून भीमराज आणि मछुआरा या फिल्म पोस्टर्सचे विमोचन केले.

या वेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचिव किसन थूल, विश्वस्त गायकवाड आणि आंबेडकरप्रेमी उत्तर भारतीय लोक मोठया संख्येने उपस्थित होते. मुहुर्तानंतर पत्रकारांशी बोलताना डायरेक्टर प्रजापती म्हणाले, की झारखंड, बिहार आणि उत्तर प्रदेशातील ग्रामीण, आदिवासी भागातील लोकांना बाबासाहेबांबद्दल अतूट श्रद्धा आहे. बाबासाहेबांना लोकांकडून अपेक्षित असलेले आचारविचार भाषेच्या मर्यादेमुळे त्यांच्यापर्यंत पोहचत नाहीत. ते त्यांच्यापर्यंत पोहचविण्याचा हा छोटासा प्रयत्न हिंदी भोजपुरी भाषेतील भीमराज फिल्मच्या माध्यमातून करतो आहोत. त्यात यश कुमार, मुकेश लाल यादव, शिलप्रकाश बौद्ध, रिचा दीक्षित, शालू सिंग, अंकुश आतकर, अमरदिप पंचिरे हे कलाकार भूमिका करणार आहेत.

यावेळी प्रोड्युसर विजयभान बुद्ध म्हणाले, की त्रिलोकी घाझीपुरी लिखित भीमराज चित्रपटाची सुरूवात डॉ.बाबासाहेबांच्या या निवासस्थानी होत असल्याचा विशेष आनंद आहे. गणतंत्रदिनी हा मुहूर्तचा योग प्रोडक्शन हेड नितीन पानसे यांच्यामुळे जुळून आला. बाबासाहेबांनी भेटी दिलेल्या देहूरोड, महाड, मुंबई आणि नागपूर या ठिकाणांवर जाणार असल्याचे अभिनेता मुकेश यादव यांने सांगितले.

5
63 views